रविवार, २९ सप्टेंबर, २०१९

शिशिर गुलाबी

धुंद गारवा जसा मारवा देही वाजवी धून
कुंदकुंदसा सुगंधी मरवा देई प्रितीची खूण


शिशिर गुलाबी पानांवरती हसून टेकवी ओठ
रोमांचित हा वात करी कुंतला लगत रुणझुण


नभ धुक्यात ओली पहाट न्हाते लावण्याची खणी
गौर तनुवर अलंकार झळकती रुपेरी उन्ह


गुलमोहर रानात हरित पानांचा फुलवी पिसारा
येई कुठूनशी लकेर कोकिळकंठी पानांमधून


सुवर्णकांती हिरवा शालू जशी देखणी ललना
प्रभात ठुमकत येई सुंदर नवनवती ही नटून


ऋतुऋतूंचे रंग आगळे ढंग करीत निःसंग
रंगोत्सव हा बघून हरखे भान मने चिरतरुण


दान सढळ करकमलांनी दिधले सृष्टीने अवघे
पाहून भरून ये उर कसे फेडावे सखये ऋण

© मृणाल घाटे,पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा