काव्यसंग्रह उजळेन तरीही....
मृणाल घाटे लिखित 'उजळेन तरीही....'
हा कवितासंग्रह नुकताच वाचून पूर्ण केला. जशी वाचत गेले तशी एकएक कविता हळूहळू उमगत, उलगडत आणि मग मनात उतरत गेली.निसर्गाचे सृजन आणि कवितेचे सृजन याची सुंदर वीण घातली आहे या कवितासंग्रहात.
या संग्रहात मला प्रकर्षाने जाणवला तो कवयित्रीच्या सृजनाचा प्रवास. तरल निसर्ग कवितांपासून सुरूवात होऊन वैश्विक होत जाणारी तिची कविता, कवितेचा जन्म कसा होतो हेही कवितेतूनच सांगते.या कविता संग्रहात स्त्री दुःख जाणिवेच्या आणि वैश्विक जाणीवेच्या कविताही भेटतात. निराशावाद नाही आणि असला तरी शेवटी आशेच्या किरण देऊन जातात. संजीवन या कवितेत
भग्न शिवालय वसे अंतरी
अशी सुरुवात...
पण शेवटी
अव्यक्त मनाच्या पारावरती
शुभ शकुनाचे रंग सांडता
अवघे जीवन हे संजीवन
पिंपळ व्हावे बघता बघता
...असा आशावाद देऊन जाते
अखेरी अखेरीस कविता अधिकाधिक प्रगल्भ आणि वैश्विक होत जाताना जाणवते. जागर या शेवटच्या कवितेत याचेच सूतोवाच केले आहे.
आस मनाची भासावरती
पुन्हा ऋतूंना येतो मोहर
जन्मोजन्मी करीन सोहळे
स्वर शब्दांचा करीत जागर
असेच स्वर शब्दांचे सोहळे मृणाल करीत राहो आणि आम्हाला त्याचा आस्वाद घ्यायला मिळो हीच सदिच्छा.!!💐
उर्मिला वाणी,पुणे
