शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९

वृत्त  - प्रभाव

सख्या तुझ्या मनातले फितूर चांदणे
तशात धुंद जाहले चतूर चांदणे

अधीर चांदरात गाइ युगुलगीत हे
सुरेल छेडलेस सूमधूर चांदणे

चकोर चांदवा जिथे चकोर गुंतला
वियोग साहवे न,अश्रुपूर चांदणे

लपेटली हळूच आज चांदरात मी
तुझेच स्पर्शभास हे टिपूर चांदणे

धपापतो मदीय ऊर का न थांबतो
अपूर्ण आस लावते निठूर चांदणे

अधीर लोचने परी भरात पौर्णिमा
अजून धुंद यौवनात चूर चांदणे

© मृणाल घाटे,पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा